मांजामुळे मुलाच्या हाताचा अंगठा निकामी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जीवघेण्या नायलॉन मांजाने बारावर्षीय मुलाच्या हाताची नस कापली. ही घटना सोमवारी (दि.९) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास विशालनगर भागातील महापालिकेच्या बागेत खेळत असताना घडली. सार्थक अर्जुन नेहरकर (१२, रा. अलंकार सोसायटी) असे जखमी मुलाचे नाव आहे. गंभीर दुखापतीमुळे सार्थकच्या हाताचा अंगठा निकामी झाला असून, त्याच्यावर तातडीने प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे.
जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयातील विधी सल्लागार अर्जुन नामदेव नेहरकर (४३) यांचा मुलगा सार्थक (१२) सोमवारी संध्याकाळी बागेत खेळण्यासाठी गेला होता. बागेत आधीच तुटून पडलेला नायलॉन मांजा त्याच्या पायात अडकला. तो काढण्यासाठी सार्थकने हात लावला असता, धारदार मांज्याने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला खोलवर कापले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. त्याला तातडीने पुंडलिकनगर रोडवरील गाढे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर मांज्यामुळे सार्थकच्या अंगठ्याची मुख्य नस पूर्णपणे कापली गेली आहे. यामुळे त्याच्या अंगठ्याची हालचाल पूर्णपणे थांबली असून तो निकामी झाला आहे. यावर तज्ज्ञ प्लास्टिक सर्जनमार्फत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या त्याच्या हाताला ५ टाके घालून प्राथमिक उपचार करण्यात आले असून, मुख्य शस्त्रक्रियेची तयारी सुरू आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि अन्य कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.